*तांत्रिक ज्ञान हे केवळ
पुस्तकी न राहता, ते प्रत्यक्ष
जीवनात बदल घडवण्यासाठी वापरणं हेच खरे अभियंतेपण आहे.*
*कथा शीर्षक:
"आभाळातली वीज, हृदयातली
आशा"*
✍️ लेखन - सुनिलदत्त कुलकर्णी कार्यकारी अभियंता, महापारेषण , जेजुरी.
नवोदित
सहाय्यक अभियंता मोहित याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. IIM नागपूरमध्ये सुरू असलेल्या इंडक्शन ट्रेनिंग दरम्यान दुपारी
लंच ब्रेक मध्ये त्याने एक बातमी वाचली होती
– *अंतराळातून वीज निर्मिती आणि ती थेट जमिनीवर आणण्याची जपानची
महत्त्वाकांक्षी योजना* . बातमी वाचताना
मोहित भारावून गेला होता. एकट्या माणसाने जर आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न
पाहिलं, तर तंत्रज्ञानाच्या
साहाय्याने ते प्रत्यक्षातही उतरवता येतं – ही जाणीव त्याच्या मनात खोलवर रुजली.
*"जग बदलण्यासाठी
मोठा विचार करावा लागतो,"* असे कालच नंदन
सरांनी सांगितले तेव्हा मोहितच्या डोळ्यांपुढे गावातील त्याचे घर, कधीही खंडित होणारी लाईट आणि आईच्या चेहऱ्यावरचा काळजीचा
भाव उभा राहिला. शेतात पाण्याचं मोटरपंप सुरु होईपर्यंत वीजेच्या भरोशावर रोज
संघर्ष चालूच असायचा.
*"आपण विद्युत
अभियंते झालो आहोत म्हणजे हे सगळं बदलायचं आहे* ," त्याने मनाशी ठरवलं.
त्याला
आठवलं – बातमीत म्हटलं होतं की *जपान सौरऊर्जेचा वापर अंतराळात करून, ती वीज थेट जमिनीवर ताऱ्यांशिवाय पाठवणार आहे! विज्ञानातील
हे मोठे पाऊल म्हणजे मानवाच्या जिद्दीचं मूर्त रूप होतं. मोहितच्या मनात एक विचार
आला – आपणही काहीतरी मोठं करून दाखवायचं. महाराष्ट्रातल्या शेवटच्या वाडीपर्यंत
उजेड पोहोचवायचा.*
प्रेरणेने
ओतप्रोत झालेला मोहित रात्री झोपताना आपल्या डायरीत लिहितो:
*"आकाशातील
सौरसेल्समधून जमिनीवर येणारी वीज ही फक्त तांत्रिक प्रगती नसून, ती आपल्यासारख्या अभियंत्यांची जबाबदारीही आहे. आपल्याकडून
सुरू होणाऱ्या एका दुरुस्त वायरने,
एका
लघुपंपाला दिलेल्या जीवनदानाने, एक छोटंसं गाव
उद्याच्या भारतात वीजेचं आत्मनिर्भर केंद्र होईल… आणि मग माझी आई, तिचा चेहरा प्रकाशात न्हालेला असेल."*
त्या
रात्री मोहित झोपला, *पण त्याच्या स्वप्नांमध्ये तो अंतराळातून सौरऊर्जेची किरणं
जमिनीवर घेत आणणारा भारतीय अभियंता होता – जपानसारखा, पण आपल्या मातीतल्या गरजांसाठी, आपल्या लोकांच्या आयुष्यात नवा उजेड देण्यासाठी.*
*कथेमागची प्रेरणा:*
ही
कथा मोहितच्या माध्यमातून प्रत्येक नवोदित अभियंत्याला एकच संदेश देते – *तांत्रिक
ज्ञान हे केवळ पुस्तकी न राहता, ते प्रत्यक्ष
जीवनात बदल घडवण्यासाठी वापरणं हेच खरे अभियंतेपण आहे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा