बुधवार, २५ जून, २०२५

# *"ज्ञानदीप : उद्याचे अभियंते घडविण्याची दिशा"*

 *#“ज्ञानाची ज्योत तेवत ठेवा, उद्याचे अभियंते घडवत राहा!”*

# *"ज्ञानदीप : उद्याचे अभियंते घडविण्याची दिशा"*
IIM नागपूरच्या विस्तीर्ण व वैभवशाली परिसरात नवचैतन्याची एक लाट निर्माण होत आहे. ही लाट आहे नवोदित सहाय्यक अभियंत्यांची – त्यांच्या डोळ्यांत स्वप्नं आहेत, मनात शिकण्याची भूक आहे. जसे कोंब गवतामधून डोकावतात तसंच हे नवखे अभियंते ज्ञानाच्या प्रकाशात वाढण्यासाठी सज्ज झाले आहेत. विद्युतशक्तीच्या विश्वात आपले योगदान देण्यासाठी ते आतुर आहेत.
या तांत्रिक विश्वात, जिथे वीज हा जीवनप्रवाह आहे, हेच तर तरुण अभियंते उद्याच्या महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्राचे नेतृत्व करणार आहेत. मात्र या जबाबदारीची वाटचाल सुरू होण्याआधी, त्यांना गरज आहे अनुभवी, मार्गदर्शक हातांची—ज्यांनी वादळं झेलली आहेत, वीज पारेषणाची पायाभरणी उभी केली आहे, आणि लाखो लोकांचे जीवन उजळवलं आहे.
MSETCL मधील हे खंबीर, अनुभवी अभियंते फक्त वीजवाहिन्या चालविणारे नाहीत; ते आहेत उद्याचे अभियंते घडवणारे शिल्पकार. त्यांच्या खांद्यावर आहे ज्ञानाचा दीप पुढच्या पिढीकडे सुपूर्त करण्याची जबाबदारी. तांत्रिक ज्ञानासोबतच ध्येय, जिद्द आणि सामाजिक भान यांचं रोपण या तरुण मनांमध्ये ते करणार आहेत.
प्रत्येक मार्गदर्शक , प्रशिक्षक हा एक "ज्ञानदीप" आहे – ज्ञानाचा प्रकाश देणारा, अंध:कारातून उजेडाकडे नेणारा. ते केवळ सूत्रं किंवा तांत्रिक कौशल्य शिकवणार नाहीत; तर ते शिकवणार अनुभव, संघर्ष, आणि उज्वल भविष्यासाठीचे स्वप्न. प्रत्येक शिकवणीतून ते या नवोदित अभियंत्यांमध्ये आत्मविश्वासाचं बीज रोवणार आहेत.. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे तरुण, आव्हानांना सामोरं जाण्यास सक्षम बनणार आहेत. – योग्य ज्ञान, योग्य दृष्टिकोन आणि योग्य मूल्यांसह.
ही केवळ एक नोकरी नाही – ही आहे एक संधी. संधी नव्या पिढीच्या जडणघडणीची. ही आहे बीजारोपणाची प्रक्रिया – कौशल्य, ज्ञान आणि आत्मविश्वास यांच्या बियांची. जसे वीज पारेषणाच्या विशाल संरचना दिमाखात उभ्या असतात, तसेच हे नवोदित अभियंते देखील आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनाखाली उद्याच्या बदलासाठी सज्ज होतील.
संध्याकाळी सुर्य मावळत असतो, पण ज्ञानाचा दीप मात्र अधिक उजळतो. दिवसागणिक हे नवखे अभियंते अधिक सक्षम, अधिक आत्मविश्वासाने भरलेले वाटचाल करतील, कारण त्यांच्या पाठीशी असणार आहे – एक न दिसणारा पण खंबीर आधारस्तंभ – त्यांचे मार्गदर्शक, प्रशिक्षक , मेंटोर अभियंते.
© सुनीलदत्त कुलकर्णी
आरटीसी जेजुरी सह केंद्रप्रमुख व कार्यकारी अभियंता, 400 केव्ही उपकेंद्र, जेजुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चला, जागरूकतेला कृतीची जोड देऊया…

  चला, जागरूकतेला कृतीची जोड देऊया… ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज  विद्युत व्यवस्था सुरळीत चालत असताना आपल्या कामाची फारशी चर्चा होत नाही. दि...